
केज/प्रतिनिधी
केज: दिनांक 08 दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळआंबा, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुक्यातील नाव्होली येथे खेती बचाव अभियान व खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच रंजीत बिक्कड प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे कृषी अभियंता श्री. प्रमोद रेणापूरकर, श्री परमेश्वर राऊत (मंडळ कृषी अधिकारी केज), आकाश कारमेंगे (सहाय्यक कृषी अधिकारी), आत्मा विभागाचे आनंद मुंडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमोद रेणापूरकर म्हणाले की कोरडवाहू शेतीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी मूलस्थानी जलसंधारण तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज आहे. उतारास आडवे बारा मीटर अंतरावर मृत सरींची निर्मिती, आंतरपीक पद्धती, पिकांमधील शेवटच्या कोळपणीच्या वेळेस सोयाबीन पिकामध्ये चार ते सहा ओळीनंतर तर कापूस पिकामध्ये दोन ओळीनंतर सऱ्याची निर्मिती यासारख्या बाबींचा अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामामध्ये उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच कोरडवाहू शेतीला यांत्रिकी पद्धतीची जोड फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पेरणी दरम्यान बियाणे, खते व तणनाशकेमध्ये बचत करण्यासाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलत्या वातावरणा नुसार कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्यास या लागवड पद्धतीतील सऱ्या द्वारे अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला प्रकारे होतो तर यंदाच्या पावसाच्या कमी प्रमाण असल्याच्या अंदाजानुसार जलसंवर्धनासाठीही लागवड पद्धत प्रत्येकाने अवलंबण्याचे गरज असल्याचे त्यांनी विशद केले. परमेश्वर राऊत म्हणाले की सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य पिकाची निवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान रुंद वरंबा सरी टोकण यंत्र तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आकाश कारमेंगे यांनी तर आभार आनंद मुंडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामहरी बिक्कड, अंगद देशमुख, अमोल बिक्कड यांनी विशेष प्रयत्न केले.
