दि.27 केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण होणे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देवून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु आहे. त्या अनुषंगाने खा.सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
बीड जिल्ह्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. त्यामुळे बीडच्या भोवताली राष्ट्रीय महामार्गांचे जाळे तयार झाल्यास शेतकरी, उद्योगधंदे, व्यवसायीक, नागरिकांना दळणवळण सोपे होवून त्यांच्या विकासात आणखीन भर पडेल. यासह महत्त्वपूर्ण मागण्या संदर्भात खा. बजरंग सोनवणेंची मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा झाली.
यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 50 हा, उमापुर फाटा-धोंडराई-उमापुर – बोधेगाव-शेवगाव ते नेवासा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग 548 डी व 548 सी वरील प्रमुख शहरांच्या भोवती नवीन बाह्य वळण रस्ता मंजूर करण्यात यावा. बीड शहरासाठी राष्ट्रीय महामार्ग-52 च्या जंक्शनपासून पालवण, तळेगाव, वासनवाडी, रामनगरपर्यंतचा बायपास रस्ता मंजूर करण्यात यावा. राष्ट्रीय महामार्ग 16 पिठ्ठी पिंपळगाव धस – गारमाथा – डोंगरकिन्ही – अंमळनेर – धामनगांव- टाकळी काझीपर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात यावा. बीड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यालगत सर्व्हिस रोड आणि व्हीयुपी कामास मंजुरी देण्यात यावी. सदरी कामे मंजूर झाल्यास बीड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल.त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होती.अशी मागणी निवेदनातून केली.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून, येत्या काळात बीड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी मंजूर केला जाईल. असा शब्द केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खा. बजरंग सोनवणे यांना दिला. त्यामुळे आगामी काळात बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर विकासाची कामे निश्चितच जलद गतीने मार्गी लागणार आहेत. सदरील विकास कामासंदर्भात आपण केंद्राकडे सतत पाठपुरावा करत राहणार आहोत. अशी माहिती खा. बजरंग सोनवणे यांनी प्रसार माध्यमातून दिली.